आपण अशिक्षित आहोत. अनपढ आहोत. गावंढळ आहोत. कधी शाळेची पायरी पण चढलेलो नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचे डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट नाही. घरची परिस्थिती अगदी गरीब. दोन वेळचे पोटभर खायला मिळण्याची पण मारामार. खिशात पैसे नाहीत, समाजात इज्जत नाही. इंग्रजी भाषेचा गंध पण नाही. वय वाढलेले. संसाराच्या जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडलेल्या. निवृत्तीचे वय जवळ येत चाललेले. निवृत्तिनंतर काहीही न करण्याचे दिवस. अनोळखी देशात येऊन पडलेलो. प्रगती न करण्याची हजारो कारणे. सतत रडत बसण्याची, दैवाला दोष देत बसण्याची सवय. अशा हतबल परिस्थितीत आपण काहिही किंवा फारसे काही करू शकत नाही या समजुतीला प्रचंड धक्का देणारी 'मिसेस बी' किंवा रोझ ब्लमकिन हीची सत्यकथा आहे. जे अशिक्षित, अंगुठेछाप, खेडवळ आणि मोडके तोडके इंग्रजी येणाऱ्या रोझसारख्या महिलेला अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये जमले ते आपल्याकडील सुशिक्षीत, उच्च विद्याविभुषी, ग्रॅज्युउट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट झालेल्या महिलांना आपल्यासारख्या प्रगतिशील देशात का जमत नाही याचे उत्तर मला काही अजून सापडत नाही. रोझची ही सत्यकथा अत्यंत प्रेरणादायी अशीच आहे. रोझची ही सत्यकथा मी आपल्याबरोबर शेअर करत आहे.