आपण कोठून आलो? आपले काय होणार? आणि या पृथ्वीवर असलेल्या सजीवांशी आपला संबंध काय? या प्रश्नांचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न मानवाने पिढ्यांनापिढ्या केला आहे. भारतापुरता विचार करायचा तर तत्वज्ञांनी याचे उत्तर फक्त एका वाक्यात देऊन ठेवले आहे अनादि अनंत काळापासून हे असेच चालले आहे. मानव आहे तसाच आहे. यानंतर मानवाचा ईश्वर होणार. मुक्ती मिळणार. जिवाची शिवाशी भेट. मृत्यूनंतर पुन्हा चौऱ्या ऐंशी लक्ष योनीतून फेऱ्या. त्यानंतर मानवी जन्म वगैरे. आपल्या कर्मानुसार गती मिळणार स्वर्ग, नरक, पाताळ लोक, पिशाच्च योनी. ज्याला जे वाटले त्याप्रमाणे त्याने सांगितले. ज्यांनी विश्वास ठेवायाचा त्यांनी ठेवला. यातील कोणतीही बाब वैज्ञानिक रीत्या सिद्ध करण्याची आवश्यकता आहे असे कधी वाटलेच नाही. उत्क्रांती ही अशीच बाब आहे. माकडाचा माणूस झाला हे आम्हाला मान्य नाही असे एका प्रतिष्ठित मंत्र्यांनीच प्रसिद्ध केले. जर माकडाचा माणूस झाला असेल तर अजून माकड शिल्लक कसे असे प्रश्न विचारले. माकडामध्ये उत्क्रांती झाली नाही की झाली हे शोधण्याचा कोणी प्रयत्नच केला नाही. या सर्वांची शास्त्रीय पातळीवर चर्चा व्हावी व मराठीमध्ये याची उत्तरे मिळावीत यासाठी हे पुस्तक लिहीलेले आहे.